https://marathiyashogathanews.blogspot.com या blog मध्ये आपले स्वागत आहे
कवितेचा आस्वाद
अगदी लहानपणापासून तुम्ही कविता शिकत आहात मिञानो
सुरुवातीला अर्थ न समजता ताला सुरात कविता गाणं, हळूहळू तिचा अर्थ समजून घेणं, वृत्त अलंकार शिकू लागल्यावर त्यातील रचनेचं तंत्र समजणं, अशा पायऱ्या ओलांडत असतानाही बरेचदा प्रश्नोत्तरं लिहिण्यापुरता कवितेचा अभ्यास करायचा पलीकडे जाणं फारच थोड्यांना जमतं. बरेचदा 'आम्हांला नाही कळत कविता; नाही आवडत कविता, अशीच आपली प्रतिक्रिया असते.
तरीही एखादी कविता आपल्याला खूप आवडते; एखादी सतत गुणगुणावीशी वाटते; कधी मन अस्वस्थ होतं; कधी आनंदाने भरून येतं; कधी कविता वाचताना डोळ्यांत पाणीही येतं. कवीने मांडलेला एखादा विचार आपल्याला अंतर्मुख करतो. एखादं व्यक्तिचित्र, त्याचं दिसणं, वागणं, त्याच्या आसपासचा परिसर, त्याचं जगणे कवी आपल्या डोळयांसमोर उभ करतो. कधी कवीच्या कल्पनेच्या भराऱ्या अनुभवायला मिळतात, तर कधी वास्तवाचं दाहक चित्रण... कवी आपल्या कवितेतून काही व्यक्त करू पाहतो, ते जाणवणं म्हणजे कवितेचा आस्वाद घेणं ! कवितेचा अर्थ मनात झिरपणं, कवितेच्या शब्दांतील ताल मनात रुणझुणणं म्हणजे कवितेचा आस्वाद घेणं हे सर्व जर विद्यार्थिदशेत घडलं तर कविता वाचावीशी वाटते. म्हणून कवितेचा आस्वाद म्हणजे नेमकं काय हे आपल्याला जाणून घ्यायचंय, अनुभवायचंय आणि ते शब्दांत व्यक्त करायला शिकायचंय.
कवितेतील आशयाचे विविध रंग उलगडणं ही कवितेच्या आस्वादातली पहिली पायरी. त्यासाठी कविता प्रथम मनात वाचा. कवितेतील शब्दांचे अर्थ, मग सोप्या शब्दांत ओळी ओळीचा अर्थ, मग संपूर्ण कवितेचा एकत्रित अर्थ प्रथम समजून घ्यायला हवा. त्यानंतर या बरवरच्या अर्थापलीकडे कवी काही व्यक्त करू पाहतोय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा.
कवितेचा विषय एकदा नीट समजला की ती कोणल्या प्रकारात मोडते याचा अंदाज घ्या. उदाहरणार्थ-निसर्गवर्णनपर, संपन्न, चिंतनपर, व्यक्तिचित्रणात्मक, संस्कारक्षम इत्यादी. त्या प्रकारच्या कवितेची वैशिष्ट्ये काय असू शकतात यादृष्टीने कवितेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा. कवीचे शब्द जेव्हा आपल्याशी बोलायला लागतील, संवाद साधतील तेव्हा आस्वादाच्या वाटेने आपला प्रवास सुरू होईल.
कवीच्या विचारभावनांना मिळालेलं शब्दरूप म्हणजे कविता | अगदी कमी शब्दांत कवी व्यक्त होऊ पाहतो, त्यामुळे कवितेचे भाषासौंदर्य, कवितेची लय हा दुसरा भाग ! कविता वाचल्यावर ती मनात गुणगुणता येते का ते पाहा. वृत्तांची लक्षणं भले माहीत नसली तरी तिची लय तुम्हांला जाणवेल. कधी गदय वाटणाऱ्या मुक्तछंदातील कवितेलाही एक आंतरिक लग असते. कवितेचा अर्थ समजला की अर्थवाही वाचनातून तीही तुम्हांला गवसेल. विशिष्ट अलंकारांचा, शब्दांचा वापर, रचनेचं तंत्र कवितेच्या सौंदर्यात भर घालतं का हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा.
खरेतर कवितेचा आस्वाद आपला आपण घ्यायचा असतो पण ती प्रक्रिया नीट व्हायला हवी. थोडं स्वतःलाही व्यक्त करायला शिकायला हवं. वरील मुद्द्यांचा विचार करत कविता वाचताना तुम्हांला जाणवलेली प्रत्येक भावना, विचार, भाषासौंदर्य हे सगळं एकत्र सुसूत्र मांडणं म्हणजे कवितेचा आस्वाद लिहिणं. पाठ्यपुस्तकातील कविता आपण शिकतो, पण प्रत्येक कवितेचं सौंदर्य वेगळं असतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजे कवितेचा आस्वाद घेणं होय !
मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी ।
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ? ।। - माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी ।
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी ||
जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार ? ।
माझ्याहुन आहे योग्य भूमीला प्रश्न विचार ।।
आभाळ म्हणाले 'नाही' - भूमीही म्हणाली 'नाही' ।
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही ||
पापण्यात जळली लंका - लाह्यांपरी आसू झाले ।
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन 'शब्दा' आले ||
दगडाची पार्थिव भिंत - तो पुढे अकल्पित सरली । 'मी कागद झाले आहे - चल लिही' असे ती वदली ।।
No comments:
Post a Comment