* द्राक्ष बागेतील फळ छाटणी व त्यानंतरची कार्यवाही *
फळ छाटणीपूर्वी करावयाच्या महत्त्वाच्या कार्यवाही फम्हणजे चारी घेऊन शेणखत व इतर खतांचा वापर करून झाकून घेणे, पानगळ करणे इ.
• फळछाटणीच्या १५ दिवस आधी बागेत दोन वेलींमधील बोदामध्ये शेणखत, शिफारशीनुसार सिंगल सुपर फॉस्फेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून बोद मातीने झाकून घ्यावा.. • वेलीवरील पानांची परिस्थिती पाहून जवळपास १२ ते १५
दिवसांपूर्वी बागेत पानगळ करावी. • फळ छाटणीपूर्वी बागेत एकदा वेलीवर तसेच जमिनीवर बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
• फळ छाटणीच्या १० ते १२ दिवसांपूर्वी बागेत पाणी बंद करावे.
● आता ऑक्टोबर महिना सुरू होत आहे. या वेळी प्रत्यक्ष फळ छाटणीला सुरुवात होईल. फळ छाटणी घेतेवेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काडीवरील डोळ्याची परिस्थिती.
• बागेतील प्रत्येक जाडीच्या ५ ते ६ काड्या काढून सूक्ष्मदर्शकाखाली डोळ्यांची तपासणी करावी. फळ छाटणी घेतेवेळी जर डोळे चांगले फुगलेले असल्यास एकसारखी फूट व त्यामधून घड बाहेर निघणे सोपे होते.
• आपल्या बागेत सरळ काडी व सबकेन अशा दोन प्रकारच्या काड्या आहेत. यापैकी दोन्ही प्रकारच्या काड्यांमध्ये घडनिर्मितीची जागा वेगवेगळी आहे. सबकेन असल्यास गाठीशेजारी छाटणे महत्त्वाचे असेल, तर सरळ काडीवर जिथे दोन पेयांतील अंतर कमी आहे अशा ठिकाणी छाटणी घ्यावी.
आपल्या बागेत पानगळ किती प्रमाणात किंवा किती दिवसांपूर्वी केलेली आहे, यावर डोळा फुगणे अवलंबून असते. डोळा जर उन्हात चांगला तापला असेल तर तो डोळा लवकर फुगतो. फुगलेला डोळा व्यवस्थित फुटून बाहेर येतो.
• जर पानगळ वेळीच आणि व्यवस्थित केलेली असल्यास फळ छाटणीनंतर डोळा फुटण्याकरिता अन्य प्रयत्न फारसे करावे लागत नाहीत. अन्यथा, डोळे एकसारखे फुटण्यासाठी रसायनांचा वापर करावा लागतो.
• आपल्या बागेतील डोळे तपासून घ्यावेत. ते चांगले उमसले असल्यास फुटी एकसारख्या व लवकर निघण्याची खात्री होते. फक्त ज्या काड्या जाड असतात, अशा काड्यांना निवडक पेस्टिंग करावी. काडीची जाडी व बागेतील तापमान या गोष्टीचा विचार करता हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग ३०-४० मि.लि. प्रति लिटर प्रमाणे करावे. त्यातून पूर्ण वेलीवरील काड्या एकसारख्या फुटतात. त्याचसोबत या काड्या पिळून घेतल्यास फूट लवकर निघते.
• फळ छटणीनंतर सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे काडीवरील ओलांड्यावरील असलेली रोगग्रस्त पाने गोळा करून
बागेच्या बाहेर टाकणे. यामुळे भविष्यात लगेच येणारा रोग
काही काळाकरिता पुढे ढकलण्यास सोपे होते. रोगाचा प्रसार
कमी राहतो. या कामासाठी पुढे लागणाऱ्या रोग नियंत्रणाच्या
खर्चापेक्षा कमी खर्च येतो.
■ फळछाटणीच्या लगेच एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
• बागेत एकसारखी फूट निघण्याच्या दृष्टीने बागेतील वातावरणात आर्द्रता भरपूर असणे गरजेचे असते. या काळात वास्तविक बागेत आर्द्रता भरपूर असते. मात्र जर बऱ्याच दिवसांपासून पाऊस नसल्याची स्थिती असल्यास बागेतील आर्द्रता वाढवण्यासाठी बोद पूर्ण भिजवून घ्यावेत.
• यानंतर बाग लवकर फुलण्याकरिता नत्राचा वापर फार गरजेचा असतो. डोळे फुगलेले असतात, तेव्हापासूनच वेलीला नत्राचा पुरवठा करावा. बागेत दिलेले पाणी व नत्र या दोन्हींच्या मिलाफ होऊन चांगले परिणाम दिसतात. फूट बाहेर पडते.
No comments:
Post a Comment